मोखाड्याचा बोहाडा !


मोखाडा, पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक, नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीलगत सहयाद्रीच्या कुशीत वसलेले दुर्गम, डोंगराळ गाव. या गावाने शेकडो वर्षांपासून श्रद्धा आणि कलेचा अनोखा संगम असलेल्या ‘बोहाडा’ उत्सवाचा वारसा अखंडपणे जपला आहे. येथे दरवर्षी होळी पासून पुढील आठ दिवस मोठ्या उत्साहाने साजरे होतात. काबाड कष्टांत जिणे कंठणारे कष्टकरी बांधव, नोकरदार तसेच सधन व्यापारी वर्ग हे आपल्या साऱ्या व्यथा, वेदना, व्याप-व्यापार झुगारुन देवून एकत्रितपणे देवी जगदंबेचा हा बोहाडा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

बोहाडा म्हणजे विविध देव-दानवांचे मुखवटे धारण करुन पौराणिक तसेच ऐतिहासिक कथांतील प्रसंगांचे विशिष्ट नृत्याविष्काराने केले जाणारे सादरीकरण ! स्वतःचे व्यक्तित्व विसरुन, धारण केलेल्या देव-दानवांच्या भुमिकेत प्रवेश करत नृत्य, गायन व अभिनयाद्वारे पौराणिक कथानके सादर करण्याचा हा अनोखा उत्सव. आपला इतिहास आणि त्यांतील संदेश भावी पिढ्यांपर्यत पोहोचवण्याचा हा एक जिवंत कलाविष्कार !

माती किंवा लाकडावर कोरीव काम करुन तयार केलेले देवा-दिकांचे मुखवटे तोंडावर बांधून नृत्य करणे असे या उत्सवाचे तीनशे वर्षापुर्वीचे प्राथमिक स्वरुप होते. मात्र बदलत्या काळानुसार त्याचे स्वरुप हळूहळू बदलत गेले. मोखाडा गाव हे तालुक्यातील बाजारहाट करण्याची मुख्य बाजारपेठ. हा संपूर्ण भाग पूर्वापार आदिवासी बहूल असलेला, परंतु व्यापार-उदीम करण्यासाठी शेजारच्या नाशिक, नगर जिल्हयातून शिंपी, तेली, ब्राह्मण, वंजारी अशा अनेक समाजाचे लोक येथे स्थायिक झाले. कालांतराने नागर संस्कृतीचा पांढरपेशा समाजही स्थानिक आदिवासी बांधवांच्या प्रथा, परंपरांमध्ये सहभागी होवू लागला. आदिवासी परंपरांच्या या महोत्सवाला नागर संस्कृतीही येवून मिळाल्याने नव्या भव्य-दिव्य स्वरूपातील, आदिवासी बांधवांच्या बोली भाषेतील बोहाडा तसेच नागरजनांच्या भाषेतील जगदंबा यात्रोत्सव हा एकत्रितपणे साजरा करण्यास सुमारे २०० वर्षापासून प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांच्या रामायण-महाभारतातील परंपरागत देवतांसोबतच नागरजनांच्या रामविजय, कृष्णविजय, विष्णुपुराण, पांडव प्रताप इत्यादी धार्मिक ग्रंथातुन आलेल्या देवतांचाही या उत्सवात समावेश होत गेला. आदिवासी कलाकारांनी आपल्या अप्रतिम हस्तकौशल्याने उंबराच्या, सागाच्या लाकडात कोरुन रेखीव पध्दतीने या विविध देवतांचे मुखवटे तयार केले तर पांढरपेशा समाजाने त्यावर आधुनिक रंग, कलाकुसर करुन ते अधिक चित्ताकर्षक बनविले.

विविध समाजातील प्रमुखांनी आपापल्या आराध्य देवतांची रुपे या उत्सवात साकारण्यासाठी निवडली व वंशपरंपरेने आजपर्यंत या घराण्यांचा वारसा पाळला जात आहे. उदाहरणार्थ जाधव, पवार, वाघ, खरपडे, गवते, गभाले या घराण्यांकडे अनुक्रमे हनुमंत, जांबुवंत, इंद्रजित -लक्ष्मण, खंडेराव-दैत्य,
गजासुर-शंकर रक्तादेवी-दैत्य, त्रिपुरासुर-शंकर आदि दैवते तर मुळे घराण्याकडे गणपती, मत्स्यावतार, कुर्मावतार, रावण, डिंगोरे घराण्याकडे सरस्वती, विरभद्र, चुंभळे घराण्याकडे नरसिंह अवतार, बेदडे यांचेकडे त्राटीका-राम-लक्ष्मण, पाटील घराण्याकडे भिम-जरासंध, वेताळ-दक्षराजा, कदम घराण्याकडे दशमुख रावण अशा प्रमुख दैवतांच्या भुमिकांचा वारसा चालत आलेला आहे. यापैकी अनेक मुखवटे २०० वर्षापासुनचे आहेत. दरवर्षी त्यांस रंग सफेती केली जाते व ही सर्व सोंगे (मुखवटे) लेवून पौराणिक पोशाख,
आयुधे परिधान करुन वाजंत्रीच्या तालावर लयबध्द नृत्याद्वारे हा बोहाडा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव एक प्रकारचा वसंतोत्सव. वसंताच्या स्वागताची तयारी भारतीय परंपरेत उत्साहाने होते. हा वसंतोत्सव मोखाडा तालुक्यातील आदिवासी, पांढरपेशी अगदी आत्मीयतेने, ग्रामदेवी जगदंबेच्या साक्षीने वर्षानुवर्षे साजरा करतात. आगामी वर्षे शांततेचे, सुख-समृध्दीचे व आरोग्यदायी जावो म्हणून देवीला साकडे घातले जाते. आदिमाया जगदंबेचे हे पीठ जागृत असल्याच्या श्रध्देपोटी कितीही दूरगावी असलेले मोखाडा तालुक्याचे रहिवासी व माहेरवाशीणी उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात.

फाल्गुन वद्य प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अष्टमी असे आठ दिवस मोखाडयात हा बोहाडा उत्सव साजरा होतो. प्रतिपदेस गणरायाच्या मिरवणुकीने उत्सवास प्रारंभ होतो. गणरायाचे जगदंबा मंदिरासमोरील मंडपामध्ये विधिवत पुजन होते. द्वितीयेस मत्स्यावतार, तृतीयेस कुर्मावतार, चतुर्थदशीस वराह अवतार, पंचमीस भिम-हिंडीबा विवाह व भिम बकासूर युध्दाचा महाभारतातील प्रसंग, षष्ठीस लहान बोहाडा, सप्तमीस रात्री ८ ते अष्टमीचे सकाळी ८ असा रात्रभर मुख्य बोहाडा उत्सव व अष्टमीस सकाळी जगदंबेची भव्य महापूजा, देवी महिषासूर, शुंभ-निशुंभ यांचे युध्द व नंतर कुस्त्यांची विराट दंगल असे या उत्सवाचे स्वरुप आहे. उत्सवाचे पहिले सहा दिवस उत्साहाने रसरसलेले असतातच, पण सातवा आणि आठवा दिवस विशेष महत्वाचा असतो. सातव्या दिवशी संपूर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांचा महापूर नटून-थटून मोखाडयाकडे लोटतो. आदिवासी स्त्रीया रंगीबेरंगी फुले, पाने, गजरे व पारंपारिक पोषाख परिधान करुन नटून-थटून येतात. तसेच या उत्सवाची माहिती असणारे लोक, आदिवासी कला-संस्कृतीचे अभ्यासक, रसिक महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून येतात. या उत्सवामध्ये तालुक्यातील मुस्लीम बांधव, त्यांचे परगावचे नातेवाईक, सासुर-वाशिणी कन्या आपले मुला-बाळांसह माहेरी येतात. गुजराथी, जैन बांधवांचे महाराष्ट्राबरोबरच गुजराथ मधील नातेवाईक देखील आवर्जून येतात, हे या यात्रोत्सवाचं आगळं वैशिष्टय आहे. यात्रोत्सवाच्या काळात गावात खाद्यपदार्थ, खेळणी, रहाट पाळणे, शोभेच्या, गृहोपयोगी वस्तू इत्यादींची शेकडो दुकाने थाटली जातात.

सप्तमीला रात्री ८ वाजता मुख्य उत्सवास प्रारंभ होतो. गावातील मुख्य रस्त्यावर हा यात्रोत्सव रंगतो. गावची वेस असणाऱ्या भगव्या ध्वजस्तंभापासून मिरवणुकांना प्रारंभ होतो. पहिला मान अर्थात श्री गणेशाचा असतो, वाजंत्री-संबळाच्या तालावर श्रीगणेशाचा आकर्षक मुखवटा तोंडावर बांधून सुंदर पितांबर, शाल, दाग-दागीने घालून पेटलेल्या टेंभ्यांच्या उजेडात गणरायाची स्वारी नृत्य करीत निघते, फुले, अक्षता कुरमुरे, लाह्या उधळल्या जातात. गणेशाचा जयजयकार करीत समस्त उपस्थितांचे हात भक्ती-भावाने जोडले जातात. जगदंबा मंदिरासमोरील रोषणाई केलेल्या मंडपात श्री. गणेशाची स्वारी आल्यावर श्री गणेशाचे विधिवत पुजन व स्तवन होते. तालुक्यात सुखसमृध्दी लाभावी म्हणून गावच्या प्रतिनिधीच्या रुपातील सुत्रधार गणेशाला विनंती करतो व श्रीगणेश आशिर्वाद देतात. या प्रसंगी होणारा संवाद अत्यंत रंगदार असतो. यानंतर सरस्वती मातेचे पुजन व स्तवन होते व त्यानंतर इतर मिरवणुका सुरु होतात. प्रत्येक सोंगाच्या मिरवणूकीचा क्रम ठरलेला असतो. सरस्वती मातेनंतर मत्स्त्यावतार राक्षस युध्द सुरु होते. एका वाहनावर मोठया आकाराच्या मास्याची प्रतिकृती ठेवलेली असते, त्याचे मुखात विष्णुरुपी लहान बालक व चारही बाजूस वेदरुपी चार बालके आकर्षक मेकअप, डोक्यावर केसांचे टोप, किरीट लावून बसविलेले असतात व या सर्वांपुढे आक्राळ-विक्राळ शंखासुर राक्षस यांचे युध्द अशी मिरवणूक पुढे जाते. त्यानंतर मारुती-जांबुवंत, त्रिपुरासूर-शंकर, त्राटिका-रामलक्ष्मण, वेताळ-दक्षराजा, गजासुर-शंकर, खंडेराव दैत्य, रक्तादेवी-राक्षस, भिम-जरासंध, एकादशीदेवी-राक्षस, इंद्रजीत-लक्ष्मण, भस्मासुर-मोहिनी या सर्वांचे युध्दाचे प्रसंग रंगतात. यानंतर दशावतारात न मोडणारे परंतू लोककलेतील चारण हे सोंग येते. डोईवर मडके, त्यांत पेटता अग्नी घेऊन गावो-गाव फिरणारी चारण (लमाणांच्या तांडयातील स्त्री) हे एक आगळेच सोंग येते. त्यानंतर भव्य-दिव्य असा दशमुखी रावण-राम-लक्ष्मण यांचे युध्द रंगते. सोबत रावणाची राक्षस सेना असते. रावण हे सोंग अत्यंत भारदस्त, भव्य व प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने या सोंगास एकाच वेळी ३ ते ४ वाजंत्रीचे ताफे आवश्यक असतात. राक्षससेना घेवून राम रावणाशी युध्द करीत रावणाची स्वारी येते. रावण व शूर्पणखा संवाद सभामंडपात रंगतो. शूर्पणखा ही रावणाची बहिण, लक्ष्मणने दंडकारण्यात नाक कापल्याबद्दल रावणाकडे तक्रार करते व संतप्त रावण राम-लक्ष्मणावर धावुन जातो. ही लढाई, रावणाचे थैमान अत्यंत पहाण्यासारखे असते. राम रावणाचा वध करतात आणि ही मिरवणूक संपते. या वेळेपर्यंत पहाटेचे ५ वाजलेले असतात. यावेळी विरभद्र-दक्ष प्रजापती लढाई रंगते. या प्रत्येक सोंगास वाजंत्रीचा ताल सुर व नृत्याचा पदन्यास वैशिष्ट्यपूर्ण असतो. आकर्षक पोशाख व दागदागिने घातले जातात. आप-आपल्या घराण्यातील देवतांचे सोंग आकर्षक दिसावे, प्रभावी वाटावे, त्याचे नृत्य बहारदार व्हावे या भावनेपोटी ते घराणे दरवर्षी हजारो रुपये खर्च करतात. सोंगास आकर्षक रंग, उत्तम पोशाख, दागीने व आरास केली जाते. सोंग घेणाऱ्यांची बोहाडा यात्रेच्या अगोदर नृत्यांचे प्रशिक्षण देवून तयारी करवुन घेतली जाते. सर्व मिरवणुका गावातील ध्वजस्तंभापासून शारदा मंदिरापर्यंत नृत्य करीत जातात. तेथून परतल्यावर देवी मंदिरा समोरील मंडपात लढाया रंगतात व येथे असुरी प्रवृत्तीचे प्रतिक असणाऱ्या सोंगाचा पाडाव होवून विजयी देवता एकटीच भगव्या झेंड्या पर्यंत विजयी मुद्रेने परतते. मुख्य सोंगास मुखवटा व त्यांचे उपसोंगास आकर्षक मेकअप, रंगरंगोटी, केली जाते. एकीकडे भराभर मिरवणूका निघतात. भरपुर सोंगे असल्याने तिकडे रंगपटातील रंगकर्मींची धांदल उडत असते. “रात्र थोडी आणि सोंगे फार” अशा म्हणींचा उदय अशा उत्सवांतूनच झाला असल्याची प्रचिती यावेळी येत असते !

रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मिरवणुका संपल्यानंतर ७ वाजता सुर्योदयाचे वेळी जगदंबा मंदिरासमोरील सभा मंडपात पौराणिक कथेतील संदर्भानुसार हिरण्यकश्यपू राजा व भक्त प्रल्हाद यांचा संवाद रंगतो. संतप्त हिरण्यकश्यपू प्रल्हादास तुझा देव कोठे आहे विचारतो, प्रल्हाद समोरच्या खांबाकडे बोट दाखवतो. उन्मत्त हिरण्यकश्यपू खांबावर लाथ मारतो, कडकड आवाज होवून खांब मोडतो व त्या पाठोपाठ आक्राळ-विक्राळ स्वरुपातील सिंह व मानव या उभय रुपातील नरसिंह प्रकटतो व त्याचे हिरण्यकश्यपूबरोबर युध्द होते. अत्यंत भव्य स्वरुपातील या युध्द प्रसंगानंतर मिरवणूकीची सांगता होते. त्यानंतर सुरु होणार असतो मुख्य कार्यक्रम. तालुक्यातील जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या ग्रामदेवी भगवती-जगदंबेच्या महापुजेस सुरुवात होते. देवी मंदिरात सकाळी ९ वाजता या मुख्य सोहळयास सुरुवात होते. उंच व्यासपीठावर मध्यभागी उंबराच्या खोडात कोरलेला जगदंबेचा भव्य व तेजपुंज मुखवटा दोन्ही बाजुस शुभं-निशुंभ, महिषासूर राक्षसांचे मुखवटे, समोर देवीचे वाहन असणारा व्याघ्र ठेवून ब्रम्हवृंदाच्या वैदिक मंत्रघोषात अत्यंत धिर गंभीर वातावरणात महापुजेस सुरुवात होते. यावेळी होणाऱ्या मंत्र जागराने मंदिर परिसरातील संपूर्ण वातावरण भक्तीभावाने भारुन जाते. जगदंबेचे रुप धारण करणाऱ्या देवीच्या सेवकाचे हस्ते ब्रम्हवृंद ही पुजा करवुन घेतात. कडक पुरश्चरण, उपोषण व अतिव भावनेच्या उद्रेकामुळे सेवकाचे अंगात प्रचंड संचार झाल्याचा भास होतो. महा आरतीने पुजा संपन्न होते. या पुजेसाठी ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, सुरत, सेलवास, जव्हार येथून असंख्य भाविक हजर असतात. ही पुजा संपल्यानंतर जगदंबेच्या मुख्य मिरवणूकीस गावची वेस असणाऱ्या ध्वजस्तंभापासून प्रारंभ होतो. व्याघ्रारुढ होऊन तोंडावर जगदंबेचा मुखवटा बांधलेल्या देवीच्या सेवकास भावना आनावर होतात, दोन्ही हातात तलवारी घेतलेली देवी दृष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यास निघते.

महिषासुराचा वध झाल्यानंतर शुभं-निशुंभ दैत्य व देवी यांची लढाई रंगते. या दैत्यांचे निर्दालन करुन विजयी भगवती परत फिरते. यावेही हजारो नारळ जगदंबेचा जयघोष करीत एकाच वेळी फुटतात. आसमंत देवीच्या जयघोषाने दुमदुमतो व अंगावर रोमांच उभे राहतात. लाहया कुरमुरे उधळले जातात. या प्रसंगी समस्त भाविक जगदंबेपुढे नतमस्तक होतात. एकदा महिषासुर देवी युध्द, दुसऱ्यांदा शुंभ राक्षस देवी युध्द व तिसऱ्या वेळी निशुंभ राक्षस देवी युध्द या ३ फेऱ्या संपल्यानंतर सुहासीनी पंचारतीने जगदंबेस औक्षण करुन पुजा करतात व त्यानंतर ही जगदंबा माता मंदिरा समोरील भव्य व्यासपीठावर स्थानापन्न होते. देवीचे हे स्वरूप जागृत असून नवसाला पावत असल्याची हजारो भाविकांची श्रध्दा आहे. गावोगावहून आलेले भाविक आपले मनोरथ व नवस देवीपुढे व्यक्त करतात. मनोरथ पूर्ण झालेले भाविक नवस फेडतात. देवीपुढे खण, नारळ, चोळी पातळे, गुळाच्या भेल्या, नारळ, खोबरे, पैसे गहू, तांदूळ, यांची रास जमते. चांदी सोन्याच्या वस्तु अर्पण केल्या जातात. इकडे जगदंबेपुढे भाविक मनोरथ मांडत असतांना तिकडे हायस्कुल मैदानात कुस्त्यांचा जंगी फड रंगतो. यात्रोत्सवाचा एक भाग म्हणून कुस्त्यांचे आयोजन होते. यासाठी गावो-गावचे मल्ल येतात. नाशिक, घोटी, नगर, वाडा, तलासरी, दादरा नगर हवेली, डहाणू, येथून अनेक मल्ल व कुस्ती शौकीन हजेरी लावतात. विजेत्या मल्लांना आकर्षक इनामे व देवीचा प्रसाद म्हणून श्रीफळ दिले जाते. विशेषत: आदिवासी मल्लांना आपले शरीर सौष्ठव व कौशल्य दाखविण्याची सुवर्णसंधी यावेळी प्राप्त होते. विजयी मल्ल पारितोषिके स्विकारतात. यावेळी जगदंबेचा जयजयकार होतो. सकाळी १० वाजता भरलेला हा फड सायंकाळी ४ वाजता संपतो. याच वेळी उत्सवाची सांगता होते.
मोखाडा गावातील हा वैशिष्टयपूर्व आनंदोत्सव अनेक वर्षांपासून अखंडपणे सुरु आहे. गावातील श्री. जगदंबा देवस्थान ट्रस्ट मार्फत या उत्सवाचे नियोजन केले जाते. यात्रोत्सवात रोषणाई, मंडप, दिवटयांसाठी तेल, पिण्याचे पाण्याची, लाईटची व्यवस्था, सोंगांना मेकअप, वाजंत्री ताफे जगदंबेच्या महापूजेचा भव्य सोहळा याची व्यवस्था ट्रस्ट मार्फत केली जाते. लोक वर्गणी व जगदंबेपुढे भाविकांनी फेडलेल्या नवसांचे खण-नारळ, साडया, चांदी सोन्याच्या वस्तु याचा लिलाव करुन येणाऱ्या रक्कमेतून हा खर्च भागविला जातो.

– अ‍ॅड. विजय धारणे.

मोखाड्याचा बोहाडा युट्यूबवर बघण्यासाठी खालील लिंक बघा
मोखाड्याचा बोहाडा !